पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील तक्रारींसाठी हेल्पलाईन व ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार
ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य; शुल्क आकारल्यास तक्रार करा: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (Farm Loan Waiver Scheme) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, काही प्रकरणांमध्ये कर्जमाफीच्या रकमेबाबत तफावत आढळून येत आहे. अशा प्रकरणांतील शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून, संबंधितांनी हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. तसेच शासनाने www.flrs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी या संकेतस्थळावरूनही आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. सध्या योजनेअंतर्गत माहिती अद्ययावत (डेटा अपडेटेशन) करण्याचे काम सुरू असल्यामुळे सर्व्हरवर तांत्रिक ताण निर्माण झाला असून, काही वेळा सर्व्हर डाऊन होत आहे. सर्व्हर पूर्ववत सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच सेवा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी विलंब न करता आपली आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, या प्रक्रियेसाठी आपले सरकार सेवा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यास मनाई आहे. कोणत्याही सेवा केंद्राकडून ई-केवायसीसाठी शुल्क आकारण्यात आल्यास संबंधितांविरुद्ध तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत माध्यमांचा वापर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी व आवश्यक असल्यास हेल्पलाईन किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.