अबब...परभणीतील आहेरवाडीच्या शाहू विद्यालयातील पोषण आहारात किडे!
४० पोती तांदुळ सीलबंद; व्हायरल व्हिडीओनंतर जिल्हा परिषद च्या शिक्षण विभागाला जाग...!
परभणी (Shahu Vidyalaya Nutritional Meal) : पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शालेय पोषण आहारासाठी साठवून ठेवलेल्या अन्नधान्यांमध्ये किडे व जाळे आढळल्याचा व्हिडिओ शिक्षण विभागापर्यंत पोहोचताच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर १५ जुलै रोजी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. गटशिक्षणाधिकारी किरण सुरोडवाड, विस्तार अधिकारी बालाजी कापसीकर, केंद्रप्रमुख सुभाष शिंदे आदींच्या पथकाने दुपारी सुमारे दीड वाजता शाळेची पाहणी केली. तपासणीदरम्यान पोषण आहारासाठी ठेवण्यात आलेल्या ४२ पोत्यांचा शालेय अन्नधान्य साठा आढळून आला. संबंधित धान्य साठ्यात किडे आढळल्याने अधिकार्यांनी धान्य साठवणूक कक्ष सीलबंद करण्याचे निर्देश दिले. यावेळी मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, संबंधित तांदूळ हा जुना साठा असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली.
मात्र या (Shahu Vidyalaya Nutritional Meal) प्रकरणाबाबत मुख्याध्यापकांनी अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. गटशिक्षणाधिकारी किरण सुरोडवाड यांनी सांगितले की, मुख्याध्यापकांकडून सविस्तर खुलासा अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येईल. दरम्यान, मुख्याध्यापकांनी खुलासा अहवाल सादर करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दोन वेळेस भेट दिली तरी त्यांचा अहवाल अद्याप स्वीकारण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाला शाळेचे प्रशासन जबाबदार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आता शिक्षण विभागाच्या अंतिम अहवालाकडे पालक आणि ग्रामस्थांची लक्ष लागले आहे.