Dashnam Gosavi Samaj: दशनाम गोसावी समाजाने देव, दे

दशनाम गोसावी समाजाचा २ ऑगस्टला लातूरमध्ये 'पंचसूत्री' सोहळा

Dashnam Gosavi Samaj

लातूर (Dashnam Gosavi Samaj) : "दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत," असे प्रतिपादन व्यंकटेश पुरी यांनी केले. दशनाम गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित भव्य 'पंचसूत्री सोहळ्याची' माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेल्या २९ वर्षांपासून अविरतपणे सामाजिक बांधिलकी जपणा-या या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्ध उद्योजक धर्मवीर भारती आणि व्यंकटेश पुरी यांनी या भव्य कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली. या पत्रकार परिषदेस गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती आणि अल्का गोसावी यांच्यासह विनायक गिरी, राजेंद्र गिरी, विनय गिरी, मोती गिरी गोसावी, मकरंद गिरी, प्रमोद बन, पद्माकर गिरी, विश्वजीत गिरी, चंद्रशेखर गिरी आणि बाळासाहेब भारती आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची सलोख्याची उपस्थिती होती.  २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतून नामांकित व्यक्ती अनुप गोसावी (नाशिक), मुन्नागीर गोसावी (पंढरपूर),  ओमप्रकाश गिरी (बीड) आणि श्री. गणेश पुरी (नागपूर) हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या 'पंचसूत्री सोहळ्यात' विविध परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शासकीय व खाजगी सेवेतून निवृत्त झालेल्या समाज बंधू-भगिनींचा कृतज्ञतापूर्वक सन्मान आणि समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्य 'समाजभूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. यासोबतच, सामाजिक बांधिलकी जपत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना 'भारती फाउंडेशन'च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाणार आहे. या सोहळ्यात सत्कार आणि स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोसह ९९२०६ २११११ (मयूर भारती प्रॉपर्टीज ऑफिस) या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे.  लातूरच्या या (Dashnam Gosavi Samaj)  ऐतिहासिक आणि प्रबोधनपर सोहळ्यास दशनाम गोसावी समाजातील सर्व समाज बांधव, भगिनी, आणि युवक-युवतींनी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दशनाम गोसावी समाज लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.