राम मंदिर देणगी भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ; लातुरात 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह
लातूर (Ram temple Corruption) : अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरासाठी देशभरातील भाविकांकडून गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज लातूर काँग्रेसच्या वतीने 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह करण्यात आला. गंजगोलाई येथील श्री जगदंबा मातेच्या महाआरतीने या आंदोलनाची सुरुवात झाली. याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी देणगी प्रकरणातील घोटाळ्याचा पाढा वाचत संघ आणि भाजपवर अत्यंत शेलक्या शब्दांत आणि तीव्र संताप व्यक्त करत घणाघाती टीका केली. श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या आणि पापाचे वाटेकरी असलेल्या या (Ram temple Corruption) प्रवृत्तींना आता तरी सुधरण्याची सद्बुद्धी मिळावी, यासाठी आई जगदंबेची आरती केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींचे 'रघुपती राघव राजाराम' हे भजन गाऊन प्रार्थना केली. तसेच, "यापुढे अशा लुटारूंनी देणगी मागितली, तर सर्वसामान्य माणूस आपल्या खिशाकडे हात नेणार नाही," असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी दिला. यावेळी विलास सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. दिनेश नवगिरे, भालचंद्र सोनकांबळे, विष्णुदास धायगुडे, ॲड. देविदास बोरुळे पाटील, मोईन सय्यद, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, असिफ बागवान, राम स्वामी, ॲड. शरद देशमुख, मारुती पांडे, सचिन केंद्रे, पटेल, रईस टाके, धोंडीराम यादव,सतीश साळुंके,अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे, राहुल देशमुख, सागर मुसंडे, अभिषेक देशमुख,भालचंद्र येडवे,भाऊसाहेब भडीकर ॲड. गणेश कांबळे, जफर पटवेकर, आसिफ मणियार,सोनू डगवाले, पवनकुमार कुमार गायकवाड,ॲड. अंगदराव गायकवाड, अक्षय मुरुळे,नारायण कांबळे, लक्ष्मण मदने, श्री दिवेकर, व्यकट सरवदे,पांडुरंग देडे आबू मणियार,संजय बिराजदार, नागनाथ डोंगरे, प्रमोद लोखंडे, करीम तांबोळी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लातूरचे सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकमुखाने या अपहार प्रकरणाचा आणि श्रद्धेशी खेळणाऱ्या प्रवृत्तींचा जाहीर निषेध नोंदवला.
दानपेटी लुटण्याचे नीचे काम संघ-भाजपवाल्यांनी केले!
माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष अभय साळुंके म्हणाले की, "या देशात पापातील पापी आणि दुष्टातील दुष्ट प्रवृत्ती होऊन गेल्या. रावण झाला, दुर्योधन झाला, परंतु या राक्षसांपैकी सुद्धा कोणी अशा प्रकारे श्रद्धेवर घाला घातला नाही. त्यांनीही कधी मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला नव्हता. ते दानपेटी लुटण्याचे नीच काम या संघ आणि भाजपवाल्यांनी केले, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी व्यक्त केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी जवळगेकर यांनीही विश्वस्त मंडळींवर जोरदार प्रहार केला. या संपूर्ण अपहाराची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी आक्रमक मागणी प्रा. जवळगेकर यांनी केली.