Kurunda Child marriage : सदर मुलगी शिकत असलेल्या ज

कुरुंदा पोलिसांनी थांबवला बालविवाह, जनजागृतीमुळे विवाह रद्द

Kurunda Child marriage

कुरुंदा (Kurunda Child marriage ) : वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात होऊ घातलेला अल्पवयीन मुलीचा बालविवाह पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून रोखला. सदर विवाह परभणी येथे पार पडणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिवाजी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगीरथ वैजनाथ सवंडकर व पोलीस शिपाई ढेंबरे यांनी संबंधित गावात जाऊन चौकशी केली. तसेच सदर मुलगी शिकत असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापकांकडून मुलीचा शालेय निर्गम उतारा तपासण्यात आला असता संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. 

यानंतर मुलीच्या आई-वडिलांना कुरुंदा पोलीस ठाण्यात बोलावून बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती देण्यात आली तसेच कायदेशीर परिणामांची जाणीव करून देण्यात आली. पोलिसांच्या समुपदेशनानंतर पालकांनी विवाह रद्द करण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले. 

या प्रकरणाची माहिती बाल संरक्षण अधिकारी श्रीमती कोरडे यांनाही देण्यात आली. संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. 

भारतात बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 अंतर्गत मुलीचे किमान विवाहयोग्य वय 18 वर्षे तर मुलाचे 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह लावणे, त्यासाठी मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे हा दंडनीय गुन्हा आहे. बालविवाहामुळे मुलीच्या शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. 

त्यामुळे नागरिकांनी अशा घटना आढळल्यास तत्काळ पोलीस, बाल संरक्षण विभाग किंवा संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.