महागाई, बेरोजगारी अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किनवटमध्ये काँग्रेसचा एल्गार
उपविभागीय कार्यालय परिसरात केले 'पेरणी आंदोलन'
नांदेड (Kinwat Congress Elgar ) : राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, नीट परीक्षेचा घोटाळा, शेतकरी कर्जमाफी आणि आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने किनवटच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील बिरसा मुंडा चौकातून या मोर्चाची सुरूवात करण्यात आली त्यानंतर उपविभागीय कार्यालय परिसरात थेट 'पेरणी आंदोलन' करून शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला.
काँग्रेस नेत्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यात राज्यातील वाढत्या बेरोजगारीमुळे युवक हवालदिल झाले असून त्यांच्यासाठी रोजगारनिर्मितीच्या ठोस योजना राबवावी, शेतकऱ्यांवरील वाढते आर्थिक संकट लक्षात घेऊन त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे विस्कळीत झाले असून, महागाई नियंत्रणासाठी शासनाने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आदिवासी, महिला आणि वंचित घटकांच्या विकासासाठी विशेष धोरण आखावे, तसेच शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक उत्तरदायी भूमिका घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
शासनाने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.हा मार्चा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट येथे (Kinwat Congress Elgar) काँग्रेसचे डॉ. पुंडलिक आमले यांच्या पुढाकारातून काढण्यात आला.
या (Kinwat Congress Elgar) मोर्चामध्ये प्रदेश सचिव धनराज राठोड, मोर्चाचे आयोजक डॉ. पुंडलिक आम्ले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुर्ती, शहराध्यक्ष गिरीश नेमानीवर, ईश्वर चव्हाण (पंचायत राज्य सचिव महाराष्ट्र), आदिवासी नेत्या नंदिनी टारफे, काँग्रेस नेते सुभाष राठोड, ईसरत चिखलीकर, वसंत राठोड, माधव खेडकर, अनिल बंगाळे (दिव्यांग तालुकाध्यक्ष काँग्रेस), शेषेराव चारोळे, डॉ. गंगासागरताई आमले, माजी सरपंच तुकाराम भिसे, दशरथ खुडे, दिंगंबर खुडे, विजय झळके, देवानंद खुडे, किशन खुडे, नामदेव आमले, राम कुसरे, दत्ता जावळे, शिवदास खुडे, प्रभाकर दर्शन्नवाड, शिवाजी बोथिंगे, माजी सरपंच माणिकराव किरवले, सरपंच सीताराम जावळे यांच्यासह महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.