Legislative Council Election: कळमनुरी तहसीलातील सर

विधान परिषद निवडणुकीसाठी कळमनुरीत शंभर टक्के मतदान

Legislative Council Election

कळमनुरी (Legislative Council Election) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी कळमनुरी तहसील कार्यालयात आज उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत कळमनुरीतील सर्व 23 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शंभर टक्के मतदानाची नोंद केली. कळमनुरीतील मतदारांमध्ये शिवसेनेचे 16 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य, भाजपचे 2 सदस्य आणि काँग्रेसचा 1 सदस्य अशा एकूण 23 मतदारांचा समावेश होता. यापैकी महायुतीकडे 22 सदस्यांचे संख्याबळ असून काँग्रेसचा एक सदस्य आहे. मतदान प्रक्रिया कळमनुरी तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या सदस्यांची रॅली काढण्यात आली. त्यानंतर सर्व सदस्यांनी तहसील कार्यालयात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत होत असताना महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या समर्थनार्थ मतदान झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच काँग्रेसच्या सदस्यानेही सईद खान यांनाच मत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे कळमनुरीतील सर्व 23 मते सईद खान यांच्या पारड्यात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मतदान प्रक्रिया गोपनीय असल्याने या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच मतदानाचा कल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कळमनुरीत झालेल्या शंभर टक्के मतदानामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.