बुलढाणा जिल्ह्यात जनसंघ, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेव

किन्होळा येथे स्व. केशवराव बाहेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे २७ जून रोजी अनावरण

Keshavrao Bahekar

(Keshavrao Bahekar) बुलढाणा जिल्ह्यात जनसंघ, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार जनतेपर्यंत पोहोचविणारे तसेच समाजकार्यात सक्रिय योगदान देणारे स्व. केशवराव बाहेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किन्होळा येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पवित्र पैनगंगा नदीकाठी वसलेल्या किन्होळा गावातील ग्रामस्थ, बाहेकर परिवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्व. केशवराव बाहेकर यांनी आपल्या कार्यकाळात जनसंघ, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संघटन उभारणी आणि जनसेवेचे उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.

या अनावरण सोहळ्याचे मा. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होणार असून, मा. आ. विजयराज शिंदे (अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा भाजप), मा. मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास लोक तांत्रिक संघटनेचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शिक्षणतज्ज्ञ माजी प्राचार्य आत्माराम बाहेकर यांच्या स्मरणार्थ डॉ. विकास बाहेकर यांनी उपरोक्त पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा दान दिली आहे, हे विशेष.

हा अनावरण सोहळा दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता किन्होळा, ता. चिखली येथे पार पडणार असून, गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.