कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अ

कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात!

Karanja Fire

कारंजा घाडगे (Karanja Fire) : कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आगीचे वृत्त समजताच परिसरात एकच धावपळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महावितरण कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत अचानक आग भडकली. आगीची तीव्रता भीषण असून, महावितरणचे कर्मचारी आपल्या स्तरावर उपलब्ध साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

अग्निशमन विभागाचा हलगर्जीपणा; सोलर प्लांट धोक्यात धक्कादायक बाब म्हणजे आग लागून बराच वेळ झाला तरीही अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकला नाही. अग्निशमन दलाच्या या विलंबाचा फटका आता बसताना दिसत आहे. आग अधिकच पसरत चालली असून, महावितरण कार्यालयाच्या समोरच असलेल्या सोलर प्लांट (सौर ऊर्जा प्रकल्प) पर्यंत या आगीच्या ज्वाळा पोहोचल्या आहेत.

सोलर प्लांटला आगीने वेढल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन बंब तात्काळ न पोहोचल्याने स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.