Kalamnuri Municipal Council: कळमनुरीच्या धोबीघाटला

कळमनुरी न.प. हिंदू स्मशानभूमीचा रस्ता मोकळा करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Kalamnuri Municipal Council

कळमनुरी (Kalamnuri Municipal Council) :  शहरातील धोबीघाट परिसरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या हिंदू स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना व शववाहिनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा गंभीर प्रश्न तात्काळ मार्गी लावून स्मशानभूमीचे शासकीय रस्ते मोकळे करून द्यावेत, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर तोषणीवाल यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री. राहुल गुप्ता यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी शहरात विविध भागांची पाहणी करण्यासाठी फेरफटका मारला होता. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान  जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरात भेडसावणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले .​जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना नंदकिशोर तोषणीवाल यांनी सांगितले की, धोबीघाट परिसरातील हिंदू स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी सध्या कोणताही हक्काचा रस्ता शिल्लक राहिलेला नाही.

रस्ता नसल्यामुळे अंत्ययात्रा नेताना आणि शववाहिनी स्मशानभूमीपर्यंत पोहोचवताना नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत या भागात चिखल आणि पाण्याचे साम्राज्य निर्माण होत असल्याने परिस्थिती अत्यंत बिकट होते ​यावर उपाय म्हणून ​जुना बस स्थानक ते मुंढळ व मसोड ला स्मशानभूमी पासून  शासकीय गाडीमार्ग जो राष्ट्रीय महामार्गाला जोडल्या जातो   हे दोन शासकीय रस्ते तातडीने अतिक्रमणमुक्त आणि मोकळे करून दिल्यास स्मशानभूमीला कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध होईल, असे तोष्णीवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा महत्त्वाचा प्रश्नही यावेळी मांडण्यात आला. रुग्णालयातील कांही वैद्यकीय अधिकारी इतरत्र प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहेत, ज्यामुळे स्थानिक रुग्णालयाच्या कामकाजावर आणि रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ पदावर परत बोलवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ​या दोन्ही गंभीर समस्या ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या प्रकरणाची दखल घेत योग्य ती सकारात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले. याप्रसंगी कळमनुरी न.प. चे मुख्याधिकारी रविराज दरक, शहरातील पत्रकार अलीमोद्दीन कादरी, मुजिब पठाण , संजय शितळे, गोविंद बेदरे इतर नागरिक आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्मशान भूमीचे प्रश्न तात्काळ मार्ग दिल्याने चे सूचना

जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांनी तोष्णीवाल यांनी निदर्शनास आणून दिलेल्या न.प. च्या हिंदू स्मशानभूमीची तात्काळ पाहणी केली रस्त्याच्या  समस्या जाणून घेतल्या सोबत असलेले मुख्याधिकारी रविराज दरक यांना  निर्देश दिले की महसूल प्रशासनाचे संपर्कात राहून रस्त्याचा विषय तात्काळ मार्गी लावावा.