कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाण; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
कळमनुरी (Kalmanuri doctor beaten) : येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कळमनुरी पोलीस ठाण्यात गुरनं 220/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 132, 115(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(S), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉ. संजयकुमार दावलु माहुरे (वय 39), रा. दवाखाना निवासस्थान, कळमनुरी हे सरकारी वैद्यकीय सेवेत कार्यरत असून ते आंध आदिवासी समाजाचे आहेत. आरोपी बाळासाहेब यादव अप्पा घुसे (वय 45), रा. तांबोळी गल्ली, कळमनुरी याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 मे 2026 रोजी दुपारी 2.40 वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात ही घटना घडली. आरोपीने आपल्या नातेवाईकांना बेड का दिला नाही, या कारणावरून डॉक्टर माहुरे यांच्याशी वाद घालत त्यांच्या डाव्या गालावर चापट मारून जखमी केले. तसेच त्यांच्या डोळ्यातील चष्माही तोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीला फिर्यादी हे मागासवर्गीय समाजातील असल्याची माहिती असतानाही हा प्रकार केल्याचा आरोप आहे.
या (Kalmanuri doctor beaten) घटनेत आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचेही नमूद करण्यात आले असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माकोडे, सपोनि शेवाळे व पोउपनि इंगळे हे करीत आहेत.