जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांना १५ वर्षानंतर नियमित वेतन सुरू
ड्रेस कोड व ओळखपत्राचे वाटप; भविष्य निर्वाह निधी व अंशदानाचा बाजार समितीकडून भरणा
जवळा बाजार (Javla Bazar Market Committee) : गत दशकभरापासून नियमित वेतना ऐवजी ॲडव्हान्सच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची सुटका झाली असून सभापती विनोदराव अंभोरे यांनी कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित वेतन देणे सुरू केले आहे. सभापती म्हणून विनोदराव अंभोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सेवाशर्तीनुसार मन लावून काम करण्याचे आवाहन करतानाच आर्थिक बेशिस्त खपवून घेणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार बाजार समिती कर्मचाऱ्यांनी नियमित वसुली करून कामाची चुणूक दाखवली. त्यामुळे सभापती विनोदराव अंभोरे यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करून ओळखपत्राचे वाटप केले. बाजार समिती कर्मचाऱ्यांचे मागील अनेक वर्षातील थकीत वेतन वाटप करून नियमित वेतन अदा करणे सुरू केले आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी व अंशदानाची रकमेचा भरणा बाजार समितीकडून करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनराव कऱ्हाळे यांच्या काळात कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन सुरू होते. त्यानंतर नियमित वेतन सुरू होण्यास सभापतीपदी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच सभापती यावा लागला ही भावना कर्मचारी वर्गात असल्याचे दिसून आले.