Risod Jain Samaj: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात ज

रिसोडमध्ये जैन समाज आक्रमक; साधू-संतांच्या सुरक्षेसाठी 'राष्ट्रीय धोरण' आखण्याची तहसीलदारांमार्फत शासनाकडे मागणी!

Risod Jain Samaj

रिसोड (Risod Jain Samaj) : मध्य प्रदेशातील रीवा येथे जैन साध्वी आर्यिका माताजी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण जैन समाजात तीव्र संताप व शोकाकूळ वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सामान्य रस्ते अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत, रिसोड येथील जैन समाजाच्या वतीने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि जैन साधू-संतांच्या सुरक्षेसाठी 'राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण' लागू करावे, या मागणीचे निवेदन २५ मे रोजी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सादर करण्यात आले. ​निवेदनात नमूद केल्यानुसार, २० मे २०२६ रोजी मध्य प्रदेशातील रीवा जिल्हा मुख्यालयातील कलेक्ट्रेट भवनासमोर राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांच्या शिष्या आर्यिका श्री १०५ श्रुतमती माताजी व आर्यिका श्री १०५ उपशममती माताजी या विहार करत असताना त्यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. उपलब्ध तथ्ये आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओ क्लिप्स पाहता, हा केवळ अपघात नसून त्यामागे गंभीर कट असण्याची शक्यता (Risod Jain Samaj) जैन समाजाने वर्तवली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक उच्चस्तरीय चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. ​जैन साधू-संत हे पूर्णतः निःशस्त्र, अहिंसक आणि पायी विहार (भ्रमण) करणारे तपस्वी असतात. ते कोणत्याही प्रकारची शासकीय किंवा खाजगी सुरक्षा न स्वीकारता समाजात शांतता आणि संयमाचा संदेश देत असतात. मात्र, अलीकडच्या काळात महामार्गांवर साधू-संतांना लक्ष्य करणे, अपघात होणे आणि त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तात्काळ विशेष धोरण राबवून जैन संतांच्या विहार मार्गांवर (पदयात्रा मार्ग) आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

​जैन समाजातील प्रमुखांची उपस्थिती

तहसीलदारांना निवेदन देताना रिसोड येथील (Risod Jain Samaj) जैन समाजाचे प्रमुख मानकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मोतिसेठ पंचवाटकर, किशोर महाजन, संदीप कुरकुटे, विनित पंचवाटकर, जितेंद्र हरावत, नितीन पंचवाटकर, गणेश देगावकर, चंद्रकुमार लवंडे, बाहुबली सराफ, देवेंद्र जोगी, सचिन सराफ, विलास जोगी, सागर काळे, कुलभूषण बेलोकर, अक्षय जोगी, महावीर संघई, जिनेंद्र शेंडे, चिन्मय लवंडे आदींचा समावेश होता. ​