पुण्यातील हडपसर परिसरात एका आलिशान गृहनिर्माण संकु

पुण्यातील हडपसरमध्ये धक्कादायक घटना; १५व्या मजल्यावरून पडून ३३ वर्षीय आयटी इंजिनियरचा मृत्यू, पोलिसांकडून सखोल तपास सुरू

IT Engineer Death

मगरपट्टा सिटीतील अमनोरा गोल्ड टॉवरमध्ये घडली घटना; घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्येचा प्राथमिक संशय, नेमके कारण अद्याप अस्पष्ट

पुण्यातील हडपसर परिसरात एका आलिशान गृहनिर्माण संकुलात ३३ वर्षीय आयटी इंजिनियरचा १५व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, प्राथमिक माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हा अपघात होता की आत्महत्या, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत तरुणाचे नाव राहुल वेधाभ्यास पटेल (वय ३३, रा. अमनोरा गोल्ड टॉवर, मगरपट्टा, साडेसतरा नळी, हडपसर; मूळ रा. ओडिशा) असे आहे. तो आयटी क्षेत्रात कार्यरत असून नोकरीनिमित्त हडपसरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल पटेल याचे आई-वडील ओडिशामध्ये राहतात. तो विवाहित असला तरी पत्नीसोबत मतभेद असल्यामुळे दोघांमध्ये घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे तो संबंधित फ्लॅटमध्ये एकटाच वास्तव्यास होता.

शनिवारी पहाटेच्या सुमारास राहुलने इमारतीच्या १५व्या मजल्यावरून उडी घेतल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोठा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचले असता तो इमारतीच्या आवारात गंभीर अवस्थेत पडलेला आढळून आला.

माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत राहुलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.