आयएमएची २० जुलैला बंदची हाक; डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरमध्येही आरोग्य सेवा राहणार बंद
लातूर (Latur Health Services) : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रच्या हाकेला प्रतिसाद देत आयएमए लातूर शाखेतर्फे २० जुलै रोजी सकाळी ६ ते २१ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत २४ तासांचे आंदोलन करण्यात येणार असून यात सर्व पॅथींचे डॉक्टर्स तसेच पॅरामेडीकल तसेच आरोग्य सेवेशी सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती आयएमए लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत आणि सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी दिली. या आंदोलनादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हिंसाचारामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. (Latur Health Services) आरोग्यसेवेवरील हिंसाचाराविरोधात शून्य सहनशीलता धोरणाची कठोर अंमलबजावणी करावी तसेच देशभर लागू होईल, असा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा तातडीने करावा, अशी मागणी आयएमएने केली असल्याचे डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी सांगितले. हल्लेखोरांवर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी केली. लातूर जिल्ह्यातील (Latur Health Services) सर्व डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे तसेच नागरिकांनी या आंदोलनाला सहकार्य करावे आणि अत्यावश्यक नसलेल्या उपचारांसाठी २० जुलै रोजी रुग्णालयात येणे टाळावे, असे आवाहन लातूर आयएमएने केले आहे.आयएमएच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास १ ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आयएमए महाराष्ट्रने दिला आहे.