औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील पारधी वाडा

जवळा बाजारात हातभट्टीवर पोलिसांचा छापा; १०० लिटर सडके रसायन जप्त, गुन्हा दाखल

Illegal Liquor Bust

औंढा नागनाथ पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई; अवैध धंद्यांवर धडक मोहीम

जवळा बाजार (Illegal Liquor Bust) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील पारधी वाडा भागात गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. औंढा नागनाथ पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग, हिंगोली यांच्या संयुक्त पथकाने १३ जून रोजी सकाळी ७ वाजता अचानक छापा टाकला.

या कारवाईदरम्यान प्लास्टिक टाकीत साठवलेले सुमारे १०० लिटर सडके रसायन जप्त करण्यात आले. पंचनामा करून त्यातील नमुने न्याय वैद्यकीय तपासणीसाठी ठेवण्यात आले असून उर्वरित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. जप्त केलेल्या रसायनाची अंदाजित किंमत सुमारे १० हजार रुपये आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, श्रीधर वाघमारे, जमादार दिलीप नाईक, शाहेद सय्यद, अमोल चव्हाण, नागनाथ नजान तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मोहन मातकर, दुय्यम निरीक्षक ज्योती गूठे, बी.डी. राठोड, एस.आर. सोनवणे व जाधव यांचा समावेश होता.

या प्रकरणी पोलीस जमादार दिलीप नाईक यांच्या फिर्यादीवरून सुमनबाई काळे (रा. जवळाबाजार) यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार सिद्दिकी करीत आहेत.

पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून हद्दीतील हातभट्टी दारू, देशी दारू विक्री तसेच इतर अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरू केली आहे. यापुढेही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.