हिंगोली पं.स. इमारतीच्या भिंती पिचकार्यांनी रंगल्या; एका वर्षापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
हिंगोली (Hingoli Panchayat Samiti) : लाखो रुपयांचा निधी खर्च करून, दिमाखात उभारण्यात आलेल्या आणि अवघ्या वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या हिंगोली पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीची अवस्था आज पाहून कोणाचाही संताप होईल. एकेकाळी जिल्ह्याच्या शान म्हणून गौरवली जाणारी ही इमारत आता अवघ्या बारा महिन्यांतच घाणीच्या विळख्यात सापडली आहे. इमारतीच्या भिंती, जिने, कोपरे आणि प्रवेशद्वाराच्या परिसरात जागोजागी गुटख्याच्या पिचकार्या, प्लास्टिकचा कचरा आणि दुर्गंधी दिसून येत आहे. गेल्या वर्षी मोठ्या गाजावाज्यात या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व सेवा मिळाव्यात, प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि सन्मानाने व्हावे या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्चून ही वास्तू उभारण्यात आली. आरशासारखे स्वच्छ फरशी, रंगीबेरंगी भिंती आणि प्रशस्त सभागृह पाहून सर्वांनाच अभिमान वाटत होता. मात्र आज त्याच इमारतीची भिंत गुटख्याच्या डागांनी काळवंडली आहे. जिन्याच्या कडांवर, शौचालयाबाहेर आणि अगदी अधिकार्यांच्या दालनासमोरही पिचकार्यांचे ठसे दिसतात. दररोज हिंगोली तालुक्यातील विविध गावांमधून शेकडो नागरिक आपल्या कामांसाठी या कार्यालयात येतात. शेतकरी, बचतगटातील महिला, ग्रामसेवक आणि सरपंचांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु इमारतीत पाय ठेवताच स्वच्छतेऐवजी अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. 'आम्ही आमच्या गावाचे काम घेऊन इथे येतो. पण आत शिरतानाच नाकाला रुमाल लावावा लागतो. एवढ्या मोठ्या इमारतीची ही अवस्था बघून लाज वाटते,' असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. या सर्व गोंधळासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. इमारतीची देखभाल, सुरक्षा आणि स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अर्थात ँDध् यांच्यावर आहे. मात्र त्यांनी या विषयाकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याचा आरोप नागरिक आणि कर्मचारी करत आहेत. सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचार्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कोणीही कुठेही गुटखा खाऊन थुंकत असल्याचे चित्र आहे.
स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली कागदावर फक्त नोंदी होतात, प्रत्यक्षात मात्र कोणीही लक्ष देत नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. एका वर्षातच कोट्यवधी रुपयांच्या सरकारी मालमत्तेची अशी दुरवस्था झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 'आम्हाला असे सुंदर कार्यालय कधी मिळाले नव्हते. उद्घाटनाला मंत्री आले, फोटो काढले आणि नंतर सर्वांनी पाठ फिरवली. आता वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का?' असा सवाल येणार्या नागरिकांकडून विचारला जात आहे. या प्रकरणाने जिल्ह्यातील प्रशासनाच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून इमारत पूर्ववत करावी, गुटखा आणि प्लास्टिकवर बंदीचे फलक लावेत, तसेच यासाठी जबाबदार असणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा लोक आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.