पोलिसातल्या अण्णासाहेबांचा प्रामाणिकपणा!
दहा लाखांच्या दागिन्यांची बॅग सुरक्षितपणे मूळ मालकास परत
लातूर (Honest Police Officer) : लातूर जिल्हा पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नसून समाजातील विश्वास, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि मानवतेचे प्रतीक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी घटना लातूर शहरात घडली आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अण्णासाहेब खोडेवाड यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल १० लाख रुपये किंमतीची सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग अत्यंत प्रामाणिकपणे सुरक्षित ठेवून मूळ मालकाचा शोध घेऊन परत केली आहे. त्यांच्या या कृतीमुळे लातूर पोलिसांची प्रतिमा अधिक उंचावली आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी (दि. १६ मे २०२६) रात्री ११ ते ११.४० च्या दरम्यान विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खोडेवाड हे त्यांच्या मित्रासह खाजगी वाहनाने जात होते. दरम्यान, ते सुशीलादेवी कॉलेजच्या पाठीमागील गेट परिसरात आले असता रस्त्याच्या कडेला एक काळ्या रंगाची बॅग संशयास्पदरीत्या पडलेली दिसून आली.
सदर बाब संशयास्पद वाटल्याने खोडेवाड यांनी तत्काळ आपले वाहन थांबवून बॅगची पाहणी केली. बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये लहान मुलांचे कपडे, पॅम्पर्स व इतर साहित्य आढळून आले. मात्र त्याखाली सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने असल्याचे लक्षात आले. प्राथमिक पाहणीत अंदाजे ६ ते ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे १ तोळा वजनाचे चांदीचे दागिने मिळून आले असून त्यांची एकूण किंमत अंदाजे १० लाख रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रथमदर्शनी ही बॅग एखाद्या कुटुंबाकडून मोटारसायकलवर प्रवास करताना नकळत रस्त्यावर पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. इतक्या मोठ्या किंमतीचा मुद्देमाल मिळूनही सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीची जाणीव ठेवून सदर बॅग सुरक्षित ताब्यात घेतली आणि सदरची बाब तत्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नमूद बॅगच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. तेव्हा सदरील सोने-चांदी असलेली बॅग ही सौ. ज्योती प्रतीक पांचाळ (प्रकाशनगर, लातूर) यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करून संबंधित व्यक्तीची योग्य ती पडताळणी व खातरजमा करून सदर मुद्देमाल मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला.
पोलिसांवरील विश्वास दृढ करणारी घटना! लातूर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री. समीरसिंह साळवे, विवेकानंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष पाटील तसेच नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड यांच्या या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कृतीचे कौतुक केले आहे.
“खाकी वर्दीतही नैतिकता, संवेदनशीलता, माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत आहे” हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. समाजामध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक बळकट करणारी ही घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.