तीन वर्षात दहा टक्क्यांनी घसरले दहावी-बारावीचे निकाल
हिंगोली जिल्हा विभागात सतत शेवटच्या क्रमांकावर शालेय शिक्षणाला लागली घरघर
बसंतकुमार भटृ हिंगोली (10th-12th Result) : दहावी - बारावीच्या निकालात हिंगोली जिल्हा विभागात सातत्याने खालच्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांत दहावी व बारावीच्या निकालात १० टक्क्यांनी घट झाली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मात्र यामध्येही सकारात्मकता शोधत असुन ‘कॉपिमुक्त अभियान’ यशस्वी झाल्याचे सांगत आहेत. यंदा लागलेल्या बारावीच्या निकालात (10th-12th Result) जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.८६ टक्के ऐवढे आहे. गतवर्षी हे प्रमाण ८८.५४ होते. तर २०२४ मध्ये ९१.८८ इतके होते. यंदा हिंगोली जिल्हा बाराविच्या निकालात विभागात शेवटच्या क्रमांकावर आहे. मागील वर्षांत जिल्हा चौथ्या क्रमांकावर होता. २०२४ च्या निकालापेक्षा यावर्षीच्या निकाला ९.०२ टक्के घट झाली आहे. बारावीच्या निकालाकडे जसे विद्यार्थी व पालक दुर्लक्ष करतात तसेच शिक्षण संस्था, शिक्षण विभाग व शिक्षक वर्ग सुध्दा दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘कॉपीसेंटर’ शोधून ११ वीत प्रवेश घ्यायचा आणि मेडीकल किंवा इंजिनिअरींगच्या तयारीसाठी कोचिंगला जायचे, ही पध्दत आता चांगलीच रूढ झाली आहे. यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालये परिक्षा कालावधीपर्यंत तद्दन ओस पडलेले असतात. काही नामवंत कनिष्ठ महाविद्यालये ओघळता, इतर महाविद्यालयांत तर विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सुध्दा कागदोपत्री असल्याचे चित्र आहे. या शैक्षणिक दुरावस्थेकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर येत्या काळात परिस्थिती अधिक भयान होईल अशी भिती व्यक्त होत आहे. यंदाचा दहावी परीक्षांचा निकालही (10th-12th Result) फारसा आशादायक नसल्याचे चित्र आहे. मागील तीन वर्षांत दहावीच्या निकालात ८.९६ टक्के घट झाली आहे. २०२३ मध्ये जिल्ह्याचा निकाल ८८.७१ टक्के होता. हा निकाल २०२४ मध्ये ९२.२२ टक्के, २०२५ मध्ये ९२.८२ टक्के तर २०२६ मध्ये ८३.२६ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ९.५६ टक्के निकालात घट झाली आहे. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी कितीही कमी जास्त आली तरी मागील चार - पाच वर्षांत जिल्हा सातत्याने विभागात शेवटच्या अर्थात पाचव्या क्रमांकावर आहे. बारावीच्या निकालाचे खापर शिक्षण खासगी कोचिंगवर फोडत असले तरी दहावीच्या निकालाबाबत निरूत्तर आहे.
विशेष म्हणजे दहावीचे (10th-12th Result) हे निकाल लावण्यातही जिल्ह्यातील खासगी कोचिंग संस्थानचा मोठा वाटा आहे. अगदी ग्रामीण भागापर्यंत सुरू असलेल्या ट्युशन क्लासेस माध्यमिक शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावत आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाचे टप्पे असलेल्या दहावी व बारावीच्या या घटत्या निकालाकडे प्रशासनाचे लक्ष आहे का, ही चर्चा करण्यासाठी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकार्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु कार्यबाहुल्यामुळे तिघांनी प्रतिसाद दिला नाही. अडीच तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या शिक्षणाधिकारी विपुल भागवत यांनी मात्र घटत्या निकाला विषयी चिंता व्यक्त केली. यावर्षी प्रशासनाने ‘कॉपिमुक्त अभियान’ राबविल्यामुळे निकाल घसरल्याचे त्यांनी सांगितले असले तरी मागील पाच वर्षांत जिल्हा शेवटच्या क्रमांकावर कसा, याचे उत्तर त्यांच्याकडेही नव्हते.
विशेष अभियान राबविणार - शिक्षणाधिकारी भागवत
दहावी व बारावीच्या (10th-12th Result) घटत्या निकालावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विपुल भागवत ह्या एकमेव अधिकार्यांनी दै.देशोन्नतीशी चर्चा केली. सातत्याने घटत जाणारा निकाल चिंताजनक असल्याचे कबुल करून त्यांनी पुढील काळात निकाल उंचावण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा आपला संकल्प असल्याचे सांगितले. सर्व शाळांकडून वार्षिक वेळापत्रक मागवून दर महिन्यात शाळा तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांची नियमित उपस्थिती, दैनंदिन वर्ग, शैक्षणिक साहित्याचा वापर, प्रयोग शाळेची सुसज्जता या विषयावर अधिक भर देणार असल्याचे सांगितले.