हिंगोलीकरां च्या पाण्याची प्रतीक्षा लांबली; सिद्धेश्वर धरणातून पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा खंडित
हिंगोली (Siddheshwar Dam Supply) : शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. शहराला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो आणि डिग्रस कराळे येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर शहरात वितरित केले जाते. मात्र सध्या या केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
14 जून रोजी 33 केव्ही लाईनवर फिल्टरच्या पाठीमागे ट्रायल घेतली असता कट पॉईंटवर आवाज आल्याचे समोर आले. या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत महावितरण चे अभियंता कामडी यांना तातडीने फॉल्ट काढण्यासाठी कळवण्यात आले आहे. सध्या जलशुद्धीकरण केंद्रात वीज नसल्याने पाणी उपसा आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
वीज विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून विद्युत पुरवठा पूर्ववत होताच (Siddheshwar Dam Supply) पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.