कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या अतिवृष्

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 6.15 लाखांच्या अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश; कळमनुरीच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा

Hingoli Subsidy Scam

2024 च्या अतिवृष्टी खरडणी अनुदानातील गैरव्यवहार उघड; आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या वितरणात झालेल्या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवल्यानंतर तब्बल 6.15 लाख रुपयांच्या अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी कळमनुरीचे सहाय्यक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापूर तर्फे शेवाळा आणि परिसरातील गावांतील शेतकऱ्यांसाठी खरडणी अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र, या अनुदानाच्या वितरणावेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तींच्या नावावर सातबारा उताराच नव्हता अशांनाही अनुदान देण्यात आले. तसेच कमी जमीनधारकांना जास्त रकमेचे अनुदान मंजूर करण्यात आले. काही प्रकरणांमध्ये शेतकरी एका गावातील असून शेती दुसऱ्या गावात दाखवून अनुदानाची रक्कम लाटल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या सर्व गैरव्यवहाराची चौकशी केल्यानंतर एकूण 6.15 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाची सुरुवात कळमनुरी तालुक्यातील पिंपरी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर झाली. तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तहसील कार्यालयाला चौकशीचे आदेश दिले.

त्यानंतर तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांनी चौकशी समितीची स्थापना केली. समितीच्या अहवालात सहाय्यक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तहसीलदारांनी स्वतः आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. बी. बसवंते आणि उपनिरीक्षक बालाजी गोणारकर करत आहेत. तपासासाठी पोलिसांनी अनुदान मंजुरीची यादी, संबंधित सातबारा उतारे तसेच ज्या बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली त्याचा तपशील मागविला आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार या गैरव्यवहारात इतर काही कृषी कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहाय्यक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार यांच्या सखोल चौकशीतून या संपूर्ण प्रकरणातील इतर संबंधितांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.