गोदामाचे वादळी वारा व पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर वखार महामंडळाकडून तातडीच्या उपाययोजना
साठा सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्ध पातळीवर
हिंगोली (Warehouse Damage Mitigation) : हिंगोली एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि.१३) झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने जवळा बाजार वखार केंद्रांतर्गत भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या एका गोदामाचे पत्रे व सांगाडा उडून गेला. या घटनेमुळे गोदामात साठवून ठेवलेल्या हरभरा साठ्याचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी शासन व शेतकऱ्यांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या तूर, हरभरा व सोयाबीन साठ्याची विक्रमी प्रमाणात साठवणूक करण्यात आली आहे. यासाठी महामंडळाच्या स्वमालकीच्या गोदामांसह आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावरील गोदामांचाही वापर करण्यात येत आहे.
नुकसानग्रस्त गोदामात साठवलेला हरभरा साठा हा खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन नाफेड व एनसीसीएफच्या नावे असल्याने संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
साठ्याचे नुकसान होऊन शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने संपूर्ण साठ्याचा विमा उतरविला असून गोदाम मालकानेही गोदामाचा विमा काढलेला आहे. नुकसानीची पाहणी विमा कंपनीमार्फत करण्यात येत असून भरपाईची प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात येणार आहे. याबाबत विमा कंपनीकडून सखोल सर्वेक्षण सुरू असून या प्रक्रियेत महामंडळाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच विभागीय स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही तपासणी व नियंत्रणाची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, साठ्याचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभाग प्रमुख, लातूर, साठा अधीक्षक जवळा बाजार तसेच इतर अधिकारी व प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित राहून गोदामातील साठा सुरक्षितपणे अन्य गोदामांमध्ये हलविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत.
महामंडळाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या विभागीय कार्यालय, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.