हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का, कळमनुरीतील म्हैसगव्हाण हे केंद्रबिंदू
गेल्या दोन महिन्यात ७ वा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
हिंगोली (Hingoli earthquake tremor): हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के सुरूच आहेत. शनिवारी सायंकाळी ६.४९ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूगर्भात ५ किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. भूकंप मापक केंद्रावर याची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. भूगर्भाची खोली पाच किलोमीटर असल्याची नोंद आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा धक्का काही सेकंदांपुरता होता. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. सायंकाळची वेळ असल्याने अनेक नागरिक घरीच होते. घरं हलल्याची जाणीव होताच म्हैसगव्हाणसह आजूबाजूच्या गावांतील लोक घाबरून घराबाहेर पडले. काही वेळ गावात घबराटीचे वातावरण होते.
यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात मागील दोन महिन्यात सहा वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पहिला धक्का वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे, त्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यातील वसई परिसरात नोंदवला गेला होता. त्यानंतर जिल्ह्याच्या इतर भागांत आणखी चार सौम्य धक्के आले होते. आता कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण येथे केंद्रबिंदू आल्याने जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
वारंवार धक्के जाणवत असल्याने महाराष्ट्रात हिंगोली जिल्हा सध्या चर्चेत आहे. "गेल्या दोन महिन्यात सातव्यांदा धक्का बसला. मुलं आणि ज्येष्ठ नागरिक खूप घाबरले आहेत. रात्री झोपताना देखील भीती वाटते," अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भूविज्ञान विभाग आणि राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्र यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील हालचालींवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे. शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
भूवैज्ञानिकांच्या मते ३.१ तीव्रतेचा भूकंप सौम्य श्रेणीत मोडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता कमी असते. मात्र सलग धक्के येत असल्याने जमिनीच्या अंतर्गत हालचालींचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. प्रशासनाने नागरिकांना घरातील जड वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे, भूकंपावेळी टेबलखाली किंवा भिंतीच्या कोपऱ्यात आश्रय घेणे, आणि आपत्कालीन क्रमांक जवळ ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील काही दिवस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.