हिंगोलीत प्रभाग ८ मध्ये एसआयआर संदर्भात अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेटी
तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांचा आढावा
हिंगोली (Hingoli SIR Campaign) : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानांतर्गत एसआयआर संदर्भात हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये २७ जुलै सोमवार रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी प्रभाग ८ मधील विविध भागांना भेटी दिल्या. मतदार नोंदणी, नावे कमी-जास्त करणे आणि दुरुस्तीच्या कामाची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली.
बीएलओ सोंडगीर आणि राजपूत यांनी टाले हॉल गल्ली, देव गल्ली आणि जमादार विहीर परिसरात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नवीन मतदारांची नोंदणी, मृत मतदारांची नावे कमी करणे तसेच पत्ता बदल आदी बाबींची माहिती त्यांनी नागरिकांकडून घेतली. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक पै. कपिल खंडेलवाल आणि नगरसेविका डॉक्टर सुरभी भरत चौधरी उपस्थित होते. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे निवारण करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. एसआयआरच्या कामात गती येण्यासाठी प्रशासनाकडून प्रभाग स्तरावर अशा प्रकारे आढावा बैठका आणि पाहण्या सुरू आहेत.