Run Water Harvesting Project: कॅच द रेन मोहीम राबव

मुख्य प्रशासकीय इमारतीवरच नाही रन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

Run Water Harvesting Project

मुख्य प्रशासकीय इमारतीचे पावसाळ्यात १८.९९ लाख लिटर पाणी वाया जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत उदासिनता

बसंत कुमार भट्ट  हिंगोली (Run Water Harvesting Project) : कॅच द रेन मोहीम राबवून जलसंधारणाचा संदेश देणार्‍या जिल्हा प्रशासनाच्या मुख्य इमारतीतच रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावरून सुमारे १८ लाख ९९ हजार ३२१ लिटर पावसाचे पाणी थेट गटारीत वाहून जात असल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागातील तज्ञांच्या मते जिल्हाधिकारी कार्यालयाचे एकूण छत क्षेत्र २७९९.१२  चौ. मीटर आहे. हिंगोली शहराची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८०० मिमी धरल्यास, पावसाळ्यात या इमारतीवरून १८,९९,३२१ लिटर पाणी संकलित होऊ शकते. येथे ०.७५ हा रन-ऑफ को-इफिशियंट म्हणजे संकलन योग्य पाण्याचे प्रमाण आहे. सध्या हे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग अर्थात जलफेरभरण नसल्याने वाया जात आहे. एकीकडे हिंगोली शहराला सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, उन्हाळ्यात अनेक भागांत टँकरने पाणी द्यावे लागते. दुसरीकडे सरकारी इमारतीतच पावसाचे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या जीआरनुसार ३०० चौ. मीटरपेक्षा मोठ्या सर्व शासकीय इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. तरीही मुख्यालयातच अंमलबजावणी नाही, असे पर्यावरण कार्यकर्ते सांगत आहेत.  छतावरील पाणी बोअरवेल पुनर्भरण (Run Water Harvesting Project) किंवा शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरवता येते. त्यामुळे भूजल पातळी वाढून परिसरातील कूपनलिकांना फायदा होईल. दरवर्षी १८.९९ लाख लिटर म्हणजे १८९ टँकर पाणी वाचू शकते. पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश देणार्‍या प्रशासनाने स्वतःपासून सुरुवात करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने आदर्श घालून दिल्यास इतर शासकीय व खासगी इमारतींनाही चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सा.बां. विभागाची जबाबदारी मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम व देखभाल - दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. या इमारतीवरील रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प करण्याची जबाबदारीही बांधकाम विभागाचीच असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगितले.

बारा वर्षात २ कोटी २८ लाख लिटर पाणी वाया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन फेब्रुवारी २००७ मध्ये झाले. याला बारा वर्षाचा कालावधी लोटला. या इमारतीच्या २७९३.१२ चौ.मी. मध्ये वर्षाला १८.९९ लाख लिटर पाणी वाया जाते. बारा वर्षामध्ये २ कोटी २८ लाख लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग अभावी वाया गेले आहे.

नगर पालिकेने राबविली सक्षमपणे योजना शहरातील २०२१ मध्ये उभारण्यात आलेल्या नगर परिषदेच्या इमारतीचे छताचे क्षेत्रफळ २१३६.३४ चौ.मी. आहे. यामध्ये वर्षाला १४ लाख ५२ हजार ७११ लिटर पाणी जमा होते. हे पाणी नगर पालिकेने तयार केलेल्या वॉटर टँकमध्ये जमा केले जाते. या वॉटर टँकमध्ये १ लाख २५ हजार लिटर पाणी साठवण क्षमता आहे. या पाण्याचा उपयोग नगर पालिका अग्निशामक दलाच्या वाहनासाठी व पालिकेने लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी केला जातो.