Hingoli Local Crime Branch: हिंगोलीत अनेक गम्भीर च

गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात हिंगोलीची स्थानिक गुन्हे शाखा अपयशी

Hingoli Local Crime Branch

गुन्हे शाखेत कार्यक्षम अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्तीची गरज

हिंगोली (Hingoli Local Crime Branch) : जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे घडलेले असताना त्याची उकल करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा अपयशी ठरत आहे. विशेषत: हिंगोली शहरात न्यायाधिश व डॉक्टरांच्या निवासस्थानी झालेल्या धाडसी चोरीचा अद्यापही उलगडा झाला नसुन त्यातील चोरटे निष्पन्न करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अपयशी ठरली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.  जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखा ही मुख्य मानली जाते. गंभीर व गुंतागुतींच्या गुन्ह्यांची उकल करणे व गुन्हेगारांना प्रतिबंध घालणे हे प्रमुख काम गुन्हे शाखेचे असते. दरोडे, चोरी, घरफोडी, मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व त्याची उकल करणे खुन, अज्ञात खुन, जबरी चोरी, सशस्त्र दरोडे आदी गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेऊन जिल्ह्यातील गुन्हेगार व गुन्हे नियंत्रित करणे असे काम स्थानिक गुन्हे शाखेचे असते. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले असताना त्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सपशेल अपयशी ठरली आहे.  विशेष म्हणजे हिंगोली शहरातील जिल्हा परिषद रस्त्यावर प्रथम श्रेणी न्यायालय कोर्ट तिसरे न्यायादंडाधिकारी श्रीमती स्मृति सागर पळसुले यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडली होती. त्यांच्या घराला लावलेले कुलूप अज्ञात चोरट्याने २९ ऑगस्टला तोडून चोरी केली होती. यामध्ये  चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा वाकवुन लॉकरचे लॉक तोडून ४८ हजार ४०० रुपयाचे दोन सोन्याचे कंकण, १ लाख ५२ हजार ९०० रुपयाचे २ सोन्याचे तोडे, १ लाख ४९ हजार ९१२ रुपयाचे सोन्याच्या ४ बांगड्या, ४१ हजार ९९० रुपयाचे १ सोन्याची बाळी, २ लाख ८७ हजार ५०० रुपयाच्या २ सोन्याच्या पाटल्या, १ लाख ८५ हजार ५०० रुपयाचा सोन्याचा राणी हार, २७ हजार रुपयाचे सोन्याचे नेक्लेस, ८७ हजार ५०० रुपयाची सोन्याची जोंधळी पोत, ६२ हजार रुपयाचे सोन्याचे ब्रासलेट, ६२ हजाराचे सोन्याचे लहान कडे, १५ हजार रुपयाचे सोन्याचे, ६ हजार रुपयाचा चांदीचा मेखला, ६९०० रुपयाचे चांदीचे वाळे, २४१० रुपयाचा चांदीचा चमचा, १ हजार रुपयाचे २ चांदीचे बेडण, १ हजार रुपयाचे चांदीचे मोत्याचे तोडे यासह सोन्याच्या अंगठ्या असा एकुण १४ लाख १ हजार ९०२ रुपयाचा ऐवज चोरीस गेल्याने ३० ऑगस्टला हिंगोली शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा प्रारंभी हिंगोली शहर पोलिसांनी तपास केला. पुढे या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. जवळपास वर्ष उलटले तरी या गुन्ह्याचा तपास लागला नसुन चोरटेही निष्पन्न करण्यात गुन्हे शाखा अपयशी ठरली आहे. त्याच प्रमाणे हिंगोलीतील अंबिका नगरातील डॉ. विकास भिमराव देवकर यांच्या तीन मजली इमारतीमध्ये २० मार्चला २०२६ अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोेंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिण्यासह नगदी रक्कम चोरून नेली. त्याच प्रमाणे त्यांच्या इमारतीमध्ये असलेले परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवा निवृत्त अधिकार्‍याच्या निवासस्थानी चोरट्यांनी चोरी करून लाखो रूपयांचा ऐवज व रोकड चोरून नेली होती. अशा अनेक गंभीर चोर्‍यांसह इतर गुन्हे उकल करण्यामध्ये ही गुन्हे शाखा अपयशी ठरली आहे. त्याच प्रमाणे मागील महिन्यात कळमनुरी शहरामध्ये दोन गटात झालेल्या तनावातून गोळीबाराची घटना घडली होती. ज्यामधील मुख्य आरोपींचा अद्यापही शोध लागला नाही. त्याच प्रमाणे आखाडा बाळापूर पोलिस ठाणे हद्दिमध्ये कृषि विभागाच्या कर्मचार्‍याचा तालुका बीज गुणन केंद्रामध्ये मागील दोन वर्षापूर्वी खुनाची घटना घडली होती. त्यामधील फरार असलेला आरोपी शोधून आणण्यात ही यंत्रणा अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे या आरोपीच्या शोधासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रारंभी १० हजार रुपये नंतर २५ हजार त्यानंतर ५० हजार रुपये आता १ लाख रूपये बक्षिस देण्याचे जाहीर केले होते.  गंभीर गुन्ह्याची उकल करण्याची प्रमुख जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेची असताना किरकोळ गुन्हे दाखल करण्यामध्येच ही यंत्रणा अधिक मग्न राहीली आहे. कर्तव्यकठोर समजल्या जाणार्‍या नूतन पोलिस अधिक्षक डॉॅ. श्रेणिक लोढा यांच्याकडून जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत. अशात अपयशी ठरलेल्या अधिकारी - कर्मचार्‍यांना घेऊन ते पुढील वाटचाल करतील की कार्यक्षम अधिकारी -कर्मचार्‍यांची नवीन नियुक्ती करून गुन्हे शाखेला अधिक कार्यक्षम बनवतील, याकडे लक्ष लागले आहे. 

गुन्हे शाखा पानटपरीतील गुटखा व दारूच्या बाटल्या जप्तीमध्ये मग्न हिंगोली शहरात न्यायाधिशांच्या व डॉक्टराच्या निवासस्थानी मोठ्या चोरीची घटना घडली होती. लाखो रूपयांचा ऐवज व रोकड चोरट्यांनी लंपास करून सुध्दा त्यातील चोरटे निष्पन्न करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अपयशी ठरली. खुनासारखे गंभीर गुन्हे घडूनही त्यातील मुख्य आरोपी गुन्हे शाखेच्या हाती लागत नाहीत. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखा ही मात्र पानटपरीवरील गुटखा आणि किरकोळ दारूच्या बाटल्या जप्त करून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यामध्ये मग्न आहे. त्यामुळे अशा बाबींकडे पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालावे अशी मागणी सुध्दा नागरीकांतून होऊ लागली आहे.