Hingoli Petrol pump:

पेट्रोल पंपावरील अनागोंदीला जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत

Hingoli Petrol pump

कॅन मध्ये डिझेल बंद करण्याची मागणी बड्या धेंडांना मध्यरात्री डिझेलचे वाटप

जवळाबाजार (Hingoli Petrol pump) : पेट्रोल पंप चालकांनी डिझेल तुटवण्याचे आभासी चित्र निर्माण केल्यामुळे रोज पंपावर डिझेल साठी होणाऱ्या गर्दीमुळे निर्माण झालेल्या अनागोंदी कारभाराला जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. सध्या शेतीची खरीप हंगामाची पूर्व मशागत मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे ट्रॅक्टर चालकांना डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत आहे. रोज ज्या पंपावर डिझेल उपलब्ध आहे तिथे रोजंदारी मजुर व शेतकरी यांना रांगेमध्ये उभे टाकून नंबर लावावा लागत आहे. डिझेल कॅन मध्ये भरून घेण्यासाठी उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना अन्न पाण्याविना दिवस काढावा लागत असताना पेट्रोल पंप चालकांकडून साधी पाणी सुद्धा उपलब्ध करून दिले जात नाही. वाहन उद्योगातील प्रस्थापितांना पेट्रोल पंप चालक मध्यरात्री लागेल तेवढे इंधन उपलब्ध करून देत असल्यामुळे डिझेलचा तुटवडा असल्याचे आभासी चित्र निर्माण केल्या जात आहे. बहुतांश ठिकाणी वाहनधारकांनी कॅन मध्ये डिझेल नेऊन घरी नेऊन मोठा स्टॉक केला असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे कॅन मध्ये इंधन न देता प्रत्यक्ष वाहनांमध्ये भरून देण्याची मागणी वाहनधारकातून केली जात आहे. रांगेमध्ये दिवसभर नंबर लावून सुद्धा पेट्रोल पंप चालकांकडून अत्यल्प डिझेल देण्यात येत असल्यामुळे बहुतांश पेट्रोल पंपावर हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. काही पेट्रोल पंपावर डिझेल विक्री बंद पाडण्यासाठी पेट्रोल पंप चालक काही मद्यपी तैनात करीत असल्याचा संशय आहे.