कोट्यवधी रुपये खर्चातून जलेश्वर तलावाचे सुशोभीकरण, अनेक पथदिवे बंद पडल्याने अंधाराचे साम्राज्य
हिंगोली (Hingoli Jaleshwar Lake) : शहराच्या मध्यवर्ती भागातील जलेश्वर तलावाचे कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आले. तलावाभोवती संरक्षण भिंत, सिमेंट रस्ता आणि आकर्षक विद्युत खांब उभारून परिसर झगमगाट करण्यात आला होता. नंदी आणि त्रिशूलाच्या कलाकृती असलेले हे पथदिवे तलावाच्या सौंदर्यात भर घालत होते. मात्र सध्या या परिसरात चित्र वेगळेच दिसत आहे.
सुशोभीकरणानंतर सुरुवातीच्या काळात तलावाच्या चोही बाजूने पथदिव्यांचा लखलखाट दिसत होता. संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुतांश पथदिवे बंद अवस्थेत आहेत. संपूर्ण मार्गावर बोटावर मोजण्याइतकेच पथदिवे सुरू असून रात्रीच्या वेळी संपूर्ण रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, लाखो रुपये खर्च करून बसवलेले दिवे देखभालीअभावी बंद पडले आहेत. (Hingoli Jaleshwar Lake) अंधारामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. तलाव परिसरात असामाजिक तत्वांचा वावर वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. सुशोभीकरणाचा मुख्य उद्देशच अंधारामुळे फोल ठरत आहे.
नगर परिषदेने कोट्यवधींचा निधी खर्च करून तलाव परिसर विकसित केला, पण दुरुस्ती आणि देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पथदिवे बंद पडून अनेक महिने उलटले तरी प्रशासनाचे याकडे लक्ष गेलेले नाही. तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
“इतका खर्च करून जर दोन दिवस प्रकाश राहत नसेल तर या सुशोभीकरणाला अर्थ काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तलाव परिसरातील बंद पथदिवे तातडीने सुरू करून रात्रीच्या वेळी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा ऐन सणासुदीच्या काळात हा परिसर अंधारातच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासन याची दखल घेऊन बंद पडलेले पथदिवे कधी सुरू करणार याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.