Hingoli Illegal Money Lending,: जिल्हा उपनिबंधक सह

अवैध सावकारीच्या संशयावरून लिंबाळा प्र.वा. येथे सहाय्यक निबंधक विभागाचा छापा

Hingoli Illegal Money Lending,

मारलेल्या छाप्यात महत्वाची कागदपत्रे व वह्या जप्त;  जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

हिंगोली (Hingoli Illegal Money Lending,) : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, हिंगोली यांच्या अधिपत्या खालील प्रशासकीय पथकाने ६ ऑगस्ट रोजी हिंगोली तालुक्यातील लिंबाळा (प्र.वा.) येथे एका अवैध सावकारी प्रकरणाच्या सत्यता पडताळणी साठी मोठी कारवाई केली. दिपाली धम्मपाल कांबळे आणि पोलीस पाटील धम्मपाल भिमराव कांबळे यांच्या राहत्या घरी ही घरझडती व पंचनाम्याची कारवाई पार पडली. अवैध सावकारीच्या (Hingoli Illegal Money Lending) अनुषंगाने मिळालेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता हे पथक लिंबाळा येथील संबंधित घरी धडकले. जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख तथा सहायक निबंधक (प्रशासन) बी. डी. पठाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या पथकामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हिंगोलीचे  विजय गिते, अनोज वानखेडे, के. जी. घालेवाड यांच्यासह पंच म्हणून नामदेव गोविंद शितोळे आणि श्रीरंग आनंदराव चव्हाण उपस्थित होते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस शिपाई विशाल इंगोले हे देखील या पथकात सहभागी झाले होते.

कारवाई दरम्यान पथकाने पंचांसमक्ष घराची चतुःसिमा व अंतर्गत रचना तपासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. घरझडती घेतली असता, अवैध सावकारी व्यवहाराशी संशयित वाटणारी विविध कागदपत्रे, करारनामे, इसार पावत्या आणि नोंदी असलेल्या वह्या आढळून आल्या. पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम १५, ३९ नुसार पुढील कारवाईसाठी खालील कागदपत्रे व साहित्य आपल्या ताब्यात घेतले आहेत त्यामध्ये   विविध इसार पावती, करारनामे, खरेदी खत करारनामे व मक्तेपत्र,  कोरे बाँड, खाते क्रमांक, भूमापन क्रमांक व फेरफार उतारे. बासंबा पोलीस ठाण्यातील एफआयआर आणि एनसीआर संबंधी कागदपत्रे.  उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार कार्यालय आणि महसूल अधिकारी सज्जड हिंगोली येथील अर्ज व नोटीस, दोन वह्याचा समावेश आहे. सदर घरझडती व पंचनाम्याची कारवाई कोणतीही दडपशाही, स्त्रीविरुद्ध अनादर किंवा प्रभावाविना अत्यंत शांततेत पार पडली. सकाळी ९:३० वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया दुपारी १२:१० वाजता पूर्ण करण्यात आली. जप्त केलेल्या कागदपत्रांची यादी संबंधित घरमालक  दिपाली धम्मपाल कांबळे व  धम्मपाल भिमराव कांबळे यांना विधिवत सुपूर्द करण्यात आली असून, या धडक कारवाईमुळे अवैध सावकारी करणार्‍या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

२४ कागदपत्र सापडले  सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने मारलेल्या छाप्यात इसार पावत्या खरेदी खताचा करारनामा, मक्तेपत्र, एक कोरे मुद्रांक शुल्क, गाव नमुना क्र.८ सह इतर कागदपत्र ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणचा वीज पुरवठा गुल झालेला असताना पथकाने मोबाईलच्या उजेडामध्ये या संपूर्ण कागदपत्राची पाहणी केली. आता ज्यांचे कागदपत्र आहेत त्यांना प्रत्यक्षात बोलावून चौकशी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.