हिंगोली जिल्ह्यातील 44,213 शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ
40 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे E-KYC अद्याप बाकी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
हिंगोली (Farm Loan Waiver Yojana) : महात्मा फुले/अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी दि. 24 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 673 गावांमधील 44,213 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा (Farm Loan Waiver Yojana) लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन E-KYC पूर्ण करणे, बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करून घेणे तसेच ऑथेंटिक आयडी नसल्यास ती काढून घेणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने कळवले आहे. सध्यास्थितीत हिंगोली जिल्ह्यातील 44,213 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी केवळ 4158 शेतकऱ्यांनीच E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित 40,055 शेतकऱ्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन E-KYC पूर्ण करून घ्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरण व ऑथेंटिक आयडीची प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असेही जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी स्पष्ट केले आहे.