वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन; ११ ऑगस्टला महावितरणवर भव्य मोर्चा
हिंगोली (Electricity Consumers' Association) : विजेच्या विविध प्रश्नांवरून ग्राहकांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहक संघटनेची चळवळ आता अधिक तीव्र होत असून, याच अनुषंगाने आज हिंगोली येथे वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आगामी ११ ऑगस्ट रोजी महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाच्या तयारीला देखील वेग आला आहे. विशेषत: ज्या ग्राहकांचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्यात आले आहेत, अशा ग्राहकांनी आपापल्या तक्रारी नोंदवण्यासाठी या नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात नंदकिशोर तोष्णीवाल, दिलीप चव्हाण, अनिल नैनवाणी, मनोज आखरे, सुरेशआप्पा सराफ, गजेंद्र बियाणी, शेख नईम शेख लाल, बसंत भट्ट, मनीष कयाल, खलील बेलदार, भिकुलाल बाहेती, प्रमोद मुंदडा, रविंद्र नैनवाणी, अशोक अग्रवाल, शशी रामेश्वरे आदींसह मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते. दरम्यान, वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी संघटना सक्रिय भूमिका घेणार असून, येणार्या काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सराफ इस्टेट, जिंतूर बँके शेजारी, अकोला रोड, शिवाजीनगर, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.