Hingoli Zilla Parishad Teacher: हिंगोली जिल्हा परि

शिक्षकांच्या पगारावरच गंडांतर: पतसंस्थेतील घोटाळ्याची चौकशी सुरू

Hingoli Zilla Parishad Teacher

६ महिन्यात अहवाल देण्याचे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांचे आदेश

हिंगोली (Hingoli Zilla Parishad Teacher) : हिंगोली जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारामुळे शिक्षक व कर्मचार्‍यांच्या पगारावरच गंडांतर आले आहे. कर्मचार्‍यांचे वेतन महिनोंमहिने थकीत असून सभासदांचे शेअर्स व ठेवीही परत दिल्या जात नसल्याच्या गंभीर तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.  या चौकशीसाठी रामेश्वर खोंड यांची एकसदस्यीय समिती म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार ६ महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश डीडीआर फुपाटे यांनी दिले आहेत.

संस्थेच्या विरोधात तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर डीडीआर फुफाटे यांनी यापूर्वीच सुनावणी घेऊन पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते व त्या ठिकाणी प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक अक्षय गुठ्ठे यांची नियुक्ती केली होती. संचालक मंडळाने बरखास्ती विरोधात विभागीय निबंधकांकडे अपील केले होते, मात्र ते फेटाळण्यात आले.  दरम्यान, संस्थेचे सचिव गंगाराम ढेंगळे व इतर चार कर्मचार्‍यांनीच संचालक मंडळाच्या कारभाराबाबत नव्याने तक्रारी केल्या आहेत. कर्मचार्‍यांचे वेतन थकीत ठेवणे, सभासदांचे शेअर्स व ठेवी परत न करणे, नियमबाह्य कर्ज वाटप करणे तसेच रोख रकमेची परस्पर उचल करणे असे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.

संचालक मंडळ बरखास्ती नंतरही संस्थेतील अंतर्गत वाद संपलेला नसून सचिव व कर्मचार्‍यांनी पुन्हा तक्रारी केल्याने डीडीआर फुपाटे यांनी थेट चौकशी समितीच नेमली आहे.  हजारो शिक्षक सभासदांचे पैसे संस्थेत अडकल्याने व कर्मचार्‍यांचे पगार थांबल्याने या चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ६ महिन्यात येणार्‍या अहवालातून गैरकारभार करणार्‍यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.