Hingoli Earthquake Tremor: हिंगोली जिल्ह्यात ४ दिव

पुन्हा हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का; ३.५ रिश्टर स्केलची नोंद

Hingoli Earthquake Tremor

४ दिवसात पाचवा भूकंप; आता वसईत केंद्रबिंदू

हिंगोली (Hingoli Earthquake Tremor) : जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरू असताना शनिवारी सकाळी ११.२६ मिनीटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तिव्रता ३.५ असुन औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथील केंद्र बिंदू आहे. वारंवार भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू वसई, ता. औंढा नागनाथ येथे असून तो भूगर्भात सुमारे ५ किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.   कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत. अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध होणार्‍या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील ८ ते १० वर्षापासून भूगर्भातून गुढ आवाज येणे व भूकंपाची मालिका सुरूच आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा, औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा या केंद्रानंतर तीन दिवसापूर्वीच औंढा ना तालुक्यातील काकडदाभा शिवारात दोन तासामध्ये तीन वेळेस भूकंप झाला होता. त्यानंतर आता ११ जुलै रोजी सकाळी ११.२६ वाजता ३. ५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्त हाणी झाली नाही. 

भूकंपाच्या खोलीत झाली घट तीन दिवसांपूर्वी वसमत तालुक्यात पांगरा शिंदे येथे झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीखाली १० कि.मी खोल होते. शनिवारच्या भूकंपाची तीव्रता कमी होती परंतु या भूकंपाचे केंद्र औंढा ना. तालुक्यातील वसई परिसरात जमिनीखाली अवघ्या ५ कि.मी वर होते. याच्या परिणामाबाबत जिल्हा प्रशासन अधिक माहिती घेत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

वसई हे भूकंपाचे नवीनच केंद्र औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत या तीन तालुक्यामध्ये प्रामुख्याने भूगर्भातून गुढ आवाज येणे व भूकंप होणे ही बाब नित्याचीच ठरली आहे. वारंवार असे प्रकार घडत असल्याने मध्यंतरी केंद्र शासनाचे पथक ही सदरील गावामध्ये आले होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. परंतु त्यानंतर कोणत्याही उपाय योजना आखल्या गेल्या नाही. औैंढा नागनाथ तालुक्यातील वसई हे आता भूकंपाचे नवीन केंद्रबिंदू ठरले आहे.