दुभाजकावर कार आदळून दोघांचा जागीच मृत्यू
हिंगोली-नांदेड मुख्य रस्त्यावर कळमनुरी जवळील अपघात
हिंगोली/ कळमनुरी (Car Accidental Death) : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर कळमनुरीजवळ १६ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच-४३-एएल-३२५३ क्रमांकाची कार हिंगोलीहून पुसदकडे जात असताना कळमनुरीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात परिमल राठोड (२४) व उदय गाजरे (१८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल कागणे (२४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, जमादार दिलीप फुले, रामा शेळके व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी परिमल राठोड व उदय गाजरे यांना तपासून मृत घोषित केले, तर जखमी अमोल कागणे यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान १७ जुलै शुक्रवार रोजी हिंगोलीतील शासकीय महाविद्यालय व रूग्णालयात मयत परीमल राठोड व उदय गाजरे या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या (Car Accidental Death) प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत कळमनुरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती जमादार दिलीप पोले यांनी दिली. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
दोघेही जीम मधील प्रशिक्षक हिंगोली शहरातील एनटीसी भागातील फिट अॅन्ड बोल्ड या जीममध्ये प्रशिक्षक म्हणुन परीमल राठोड व उदय गाजरे हे होते. दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.