मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, नागरिकांनी मोठ्या संख्येने गणना फॉर्म जमा
सेनगाव (Voter List SIR) : मतदार यादीत अचूकता आणण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत "मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदारांकडून घरोघरी जाऊन गणना फॉर्म भरून घेतले जात आहेत. कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होऊ नये यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा. राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम वेगाने पुढे जात आहे. यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती चोंडेकर मॅडम, मतदान नोंदणी अधिकारी समाधान घुटूगुडे आणि सेनगावचे तहसीलदार श्री. सखाराम मांडवगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
सेनगाव नगरपंचायत क्षेत्रातही या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमांतर्गत सेनगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षा यमुनाबाई नारायणराव देशमुख यांनी सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी गणेश गांजरे आणि मतदार केंद्रस्तरीय अधिकारी तिडके यांच्याकडे आपला गणना फॉर्म सुपूर्द केला. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना लवकरात लवकर आपले गणना फॉर्म भरून जमा करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी पर्यवेक्षक श्री. शेख यांच्यासह श्री. दिनकर जगन्नाथ, श्री. पडोळे, बोकारे हे नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
आज या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संदेश देशमुख, नगरपंचायत उपाध्यक्ष शिलानंद वाकळे, गटनेते अमोल तिडके, नगरसेवक निखिल देशमुख, वैभव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश खाडे, व्यापारी संघाचे अध्यक्ष राजकुमार देशमुख, उमेश देशमुख, शहराध्यक्ष भाजपा बाळू उफाड तसेच प्रसिद्ध व्यापारी श्री. गिरधारी तोष्णिवाल यांच्यासह अनेक नागरिकांनी आपले फॉर्म जमा करून प्रशासनाला सहकार्य केले.
या पार्श्वभूमीवर सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी शक्य तितक्या लवकर योग्य माहिती भरलेले गणना फॉर्म आपल्या संबंधित BLO यांच्याकडे जमा करावेत. यामुळे मतदार यादी शुद्ध होण्यास मदत होईल आणि प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहील.