विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार
मतदार पडताळणी, गणना पत्रक वितरण व डिजिटायझेशनची कामे वेळेत पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा गौरव
हिंगोली (SIR Campaigns) : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदार पडताळणी, गणना पत्रक वितरण व डिजिटायझेशनची कामे शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सत्कार करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहीम सुरू असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 1015 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कार्यास सहाय्य करण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत 37 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेदरम्यान मतदारांना गणना पत्रकांचे वितरण, प्राप्त गणना पत्रकांचे संकलन तसेच माहितीचे डिजिटायझेशन ही प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा गौरव करून जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तसेच निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सत्कार करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसमत विधानसभा मतदारसंघातील टी. टी. जंगले, मुंजाजी असोले, सुरेश जाधव, कळमनुरी मतदारसंघातील एस. डी. लोंढे तसेच हिंगोली मतदारसंघातील जी. एन. वानखेडे, श्रीमती एस. के. चव्हाण, आर. जे. अंडीले, डी. एम. गडदे, पी. यू. राजपूत आणि ए. एस. धुमाळ यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्रगती चोंडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.