जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम २० एप्रिलपासून सुरू
हिंगोली (Helmet Mandatory) : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी दुचाकीस्वारां मध्ये सुरक्षितते बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम सोमवार २० एप्रिलपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे हेल्मेट न घालणार्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९/१७७ अन्वये हेल्मेट परिधान न करणार्या चालकांवर कारवाईची तरतूद असून, या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली, शहर वाहतूक शाखा, हिंगोली तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे, याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली निर्देश देण्यात आले आहेत. ही संयुक्त मोहीम २० एप्रिल ते ३० मे २०२६ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कालावधीत हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहन चालक व मालकांनी वाहन चालविताना अनिवार्यपणे हेल्मेट परिधान करावे, अन्यथा मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.