Hingoli Collector Office: हिंगोलीत आठवड्याच्या पहि

हिंगोलीत सूर्य ओकतोय आग; जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट!

Hingoli Collector Office

आठवड्याचा पहिलाच ‘वर्किंग डे' असूनही उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांची पाठ; मुख्य परिसर ओस

हिंगोली (Hingoli Collector Office) : मागील काही दिवसांपासून हिंगोली शहर आणि जिल्हाभरात तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून, कडक उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सोमवारी आठवड्याचा पहिलाच कामकाजाचा दिवस (वर्किंग डे) असूनही, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. याचा थेट परिणाम शासकीय कार्यालयांवर झाला असून, नेहमी गर्दीने गजबजणारे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसर पूर्णपणे शुकशुकाट दिसत होता. दर सोमवारी विविध कामांसाठी जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. मात्र, दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता असह्य झाल्याने लोकांनी (Hingoli Collector Office) कार्यालयांमध्ये जाणे टाळले. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयच नव्हे, तर इतर शासकीय विभागांमध्येही शुकशुकाट होता. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडत नसल्याने रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ कमालीची घटली होती.

हिंगोलीतील तापमान सातत्याने वाढत असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी ११ ते दुपारी ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देण्याासाठी भरपूर पाणी, लिंबू सरबत किंवा ताक प्यावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. या वाढत्या उन्हामुळे आगामी काही दिवसांत बाजारपेठांमधील दुपारच्या वेळच्या गर्दीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.