अमरावती जिल्ह्यातील बार जवळ वर्धा जिल्ह्याचे शासकी

दारूबंदी असलेल्या वर्ध्याची “महाराष्ट्र शासन”ची गाडी अमरावतीच्या बार समोर ; नेमके काय चालले होते?

Government Vehicle

वर्धा (Government Vehicle) : तळेगाव (श्यामजीपंत) परिसरालगत अमरावती जिल्ह्यातील एका बार अँड रेस्टॉरंटजवळ वर्धा जिल्ह्याचे शासकीय वाहन (क्रमांक MH 32 AH 2838) आढळल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. माहितीनुसार, संबंधित वाहन काही काळ बार परिसरात उभे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही व्यक्ती बारच्या भागातून बाहेर येऊन त्या वाहनाजवळ आल्या व त्यानंतर वाहन तळेगावच्या दिशेने रवाना झाले, अशी माहिती समोर आली आहे.

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी लागू असल्याने, जिल्ह्यातील MH-32 क्रमांकाची कोणतीही गाडी बारसमोर दिसणे हे विशेष मानले जात नाही. मात्र, संबंधित वाहनावर “महाराष्ट्र शासन” असा उल्लेख असल्याने या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. शासकीय वाहन वर्धा जिल्ह्याबाहेर जाऊन अमरावती जिल्ह्यातील बारजवळ का उभे होते, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून, या घटनेमागील कारण स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नसून, वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.