नगरपालिकेच्या घंटागाडीबाबत गंभीर अनियमितता असल्याच

विना क्रमांक, विमा नसलेली घंटागाडी थेट पोलीस ठाण्यात

Garbage Vehicle

वंचित बहुजन आघाडीचा नगरपालिकेविरोधात आक्रमक पवित्रा; पोलिसांकडून तीन हजारांचा दंड

कळमनुरी (Garbage Vehicle) : नगरपालिकेच्या घंटागाडीबाबत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी १२ जून रोजी संबंधित घंटागाडी थेट पोलीस ठाण्यात आणून निषेध नोंदविला. वाहनाची कागदपत्रे तपासल्यानंतर पोलिसांनी तीन हजार रुपयांचा दंड आकारल्याची माहिती समोर आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घंटागाडीला वाहन क्रमांक नसून तिचा विमाही काढलेला नव्हता. तसेच वाहन तांत्रिकदृष्ट्या सदोष असून दुरुस्तीची आवश्यकता असतानाही ती रस्त्यावर चालविली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

सफाई कामगारांनी या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्याचा दावा करण्यात आला. संबंधित घंटागाडी चालविण्यास आपण इच्छुक नसल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला कळविले होते. मात्र, त्यांच्याकडूनच सदोष अवस्थेतील वाहन चालवून घेतले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन?

नगरपालिकेच्या वाहनाला ना क्रमांक, ना विमा आणि तरीही ते सार्वजनिक रस्त्यावर वापरले जात असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. संबंधित वाहनावर कायदेशीर कारवाई करून दंड आकारण्यात यावा, अशी मागणी आघाडीच्या वतीने करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी घंटागाडी पोलीस ठाण्यात आणून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी राजू कांबळे, अस्लम शेख, पाईकराव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणामुळे नगरपालिकेच्या वाहन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित वाहनाची कागदपत्रे, विमा आणि तांत्रिक स्थितीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. या आरोपांबाबत नगरपालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.