अकोलात पुरी-अजमेर एक्सप्रेसमध्ये गांजाची मोठी जप्ती
- पुरी-अजमेर एक्सप्रेसमधून दोन संशयित ताब्यात - NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
अकोला - अकोला रेल्वे पोलीसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत ६७ हजार ५०० रुपयांच्या गांजासह दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. ही कारवाई NDPS कायद्याअंतर्गत करण्यात आली असून रेल्वे परिसरात अवैध वाहतुकीवर पोलिसांनी पुन्हा एकदा लगाम घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार सतीष जवंजाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार ट्रेन क्रमांक २०८४३ पुरी-अजमेर एक्सप्रेस अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आल्यानंतर दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे फारूक खान हफिजउल्ला खान ४३, रा. खदान, अकोला व शेख अजीज शेख महेबूब ४५, रा. सोनटक्के प्लॉट, अकोला अशी सांगितली. त्यांच्या जवळील दोन वेगवेगळ्या प्रवासी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या सेलोटेपने बांधलेले बंडल आढळून आले. या बंडलमध्ये एकूण ९ किलो ४१० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ६७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा परराज्यातून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्याच्या कलम २० (ब) (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे , अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप डोलारे, उपनिरीक्षक प्रशांत मुंडे सतीष चव्हाण, सतीष जंवजाळ, गौतम शिरसाट, कपील गवई, तुषार गोंगे, विजय शेंगावकर, कुणाल साखरे आदींनी केली.