शेतीप्रधान गावांमध्येही अंमली पदार्थांची लागवड होत

घराच्या कुंपणालगतच गांजाची शेती; हमदापूरात पोलिसांची धाड

Ganja Seized

दोन झाडांतून ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त

वर्धा (Ganja Seized) : शेतीप्रधान गावांमध्येही अंमली पदार्थांची लागवड होत असल्याचे धक्कादायक वास्तव हमदापूर येथे उघडकीस आले आहे. दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हमदापूर गावात एका व्यक्तीने आपल्या घराच्या कुंपणालगतच गांजाची झाडे लावल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ धाड टाकत कारवाई केली.

या कारवाईत प्रफुल तुळसीराम शंभरकर यांच्या घराजवळून तब्बल पाच फूट उंचीची गांजाची दोन झाडे जप्त करण्यात आली. झाडांची पाने, फांद्या आणि मुळे यांसह वजन केल्यानंतर एकूण ४ किलो ९२ ग्रॅम गांजा वनस्पती आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ८१ हजार ८४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध दहेगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.