गडचिरोलीतील बंगाली बांधवांच्या मागण्यांसह घोट येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा
घोट (Gadchiroli Bengali People) : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यात आला. यावेळी घोट परिसरातील प्रमुख कार्यकर्ते तसेच बंगाली समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यातील सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या घोट परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी घोट येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय तात्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ४८ बंगाली गावांच्या (Gadchiroli Bengali People) विकासासाठी विशेष आर्थिक तरतूद करणे, पुनर्वसित बंगाली बांधवांच्या वर्ग-२ शेतजमिनींचे विनामूल्य वर्ग-१ मध्ये रूपांतर करून मालकी हक्क प्रदान करणे आणि क्षेत्रातील ८२ नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देणे या मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्न व पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी सांगितले.याप्रसंगी घोट परिसरातील माजी पोलीस पाटील अविनाश वडेटीवार, आसिफ सय्यद, दिनकर लाकडे, गिरीश उपाध्ये, बाबुराव भोवरे, हेमंत उपाध्ये, बबलू शहा, बंडू भांडेकर, दीपक हलदर, सतीश राय, अनिता राय, शिल्पा राय यांच्यासह बंगाली समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.