धंतोलीतील नेहजीत अपार्टमेंटमध्ये एसीला आग; वृद्ध दाम्पत्याची सुखरूप सुटका
नागपूर : मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजताच्या सुमारास धंतोली परिसरातील निम्स हॉस्पिटललगत असलेल्या नेहजीत अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, दिलीप कोचे यांच्या फ्लॅटमधील एअर कंडिशनर (एसी) मध्ये बिघाड झाल्याने आग लागली. त्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण फ्लॅटमध्ये काळ्या धुराचे लोट पसरले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे एक बंब घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू करत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी फ्लॅटमध्ये एक वृद्ध दाम्पत्य झोपलेले होते. एसीमधून अचानक आग लागल्याने काही क्षणांतच फ्लॅटमध्ये दाट काळा धूर पसरला. सुदैवाने, नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनास्थळी पाहणीदरम्यान इमारतीमध्ये आपत्कालीन अग्निसुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी इमारतीतील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे.