अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून तु

'मुंढेंना हटवण्यासाठी २५० कोटी'; FDA कारवाईमुळे ड्रग्ज लॉबी अस्वस्थ? आव्हाडांचे आरोप, झिरवाळांचे स्पष्टीकरण

FDA Commissioner

FDA आयुक्तांच्या कारवाईमुळे ड्रग्ज लॉबी आणि मेडिकल कंपन्या अस्वस्थ; नरहरी झिरवाळ यांचे बदलीचे वृत्त फेटाळले, अर्जुन खोतकर यांनी संरक्षणाची मागणी केली

मुंबई (FDA Commissioner) : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या भेसळविरोधी कारवाईवरून विधानसभेत मोठी चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीकडून तब्बल २५० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपांनंतर राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विधानसभेत बोलताना आव्हाड यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हे खाते राज्यासह देशभर चर्चेत आले आहे. शासनाने या विभागाकडे यापूर्वी आवश्यक त्या गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप करत त्यांनी भेसळीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याची बाब मांडली. तसेच तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा अद्ययावत नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

'ड्रग्ज लॉबी आणि मेडिकल कंपन्या एकत्र आल्या'

आव्हाड यांनी दावा केला की, तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईमुळे ड्रग्ज लॉबी, मेडिकल कंपन्या आणि इतर काही घटक एकत्र आले असून त्यांच्या बदलीसाठी २५० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. पुढील आठवड्यात संबंधित व्यक्तींची नावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी विधानसभेत सांगितले.

यावेळी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग प्रत्यक्षात मंत्री नरहरी झिरवाळ चालवत नसून, पडद्यामागून इतर काही लोक विभागावर प्रभाव टाकत असल्याचाही आरोप केला.

'पालघरला उतरलेला गुटखा महाराष्ट्रभर कसा पोहोचतो?'

जितेंद्र आव्हाड यांनी विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. पालघर येथे उतरलेला गुटखा राज्यभर कसा पोहोचतो, असा सवाल त्यांनी उपस्थित करत अधिकाऱ्यांमध्येही लॉबी कार्यरत असल्याचा आरोप केला. प्रयोगशाळांमध्ये नमुने गेल्यानंतर प्रकरणे फेल ठरवली जातात आणि सेटलमेंट केली जाते, असेही त्यांनी म्हटले.

'मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर दबाव'

आव्हाड यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरही मोठा दबाव असल्याचा दावा केला. झिरवाळ हे साधे आणि सामान्य स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर बाजारातील अनेक संशयास्पद उत्पादने गायब झाल्याचा उल्लेख करत, राज्यातील भेसळ रोखण्यासाठी जनतेनेही या विषयाकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.

तांदूळ, मावा आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीचा उल्लेख करत, आश्रमशाळांपर्यंत भेसळयुक्त अन्न पोहोचत असल्याची गंभीर बाबही त्यांनी विधानसभेत मांडली.

बदलीचा प्रश्नच नाही; मंत्री झिरवाळांचे स्पष्टीकरण

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. FDA कडून सध्या प्रभावी कारवाई सुरू असल्याचे सांगत त्यांनी विभागातील अधिकाऱ्यांसाठी वाहन आणि कार्यालयीन सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

'मुंढे यांच्यातील टी आता टायगरमधील टी'

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. "तुकाराम मुंढे यांच्यातील 'टी' आता 'टायगर'मधील 'टी' झाला आहे. ते चांगले काम करत असून त्यांना किमान तीन वर्षे या पदावर कायम ठेवले पाहिजे," असे ते म्हणाले.

याच चर्चेदरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना आवश्यक ते सुरक्षा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.