वसमत तालुक्यातील माळवटा येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ

माळवटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

वसमत तालुक्यातील माळवटा येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती संकटात आली असून आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माळवटा येथील संभाजी टोमके (वय 35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मयत हे अल्पभूधारक शेतकरी होते. निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी तसेच पावसाअभावी सुगी हातची जाण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते.

नेहमीप्रमाणे ते शेतात गेले; मात्र परत आले नाहीत. त्यानंतर ते शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब समजताच कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांना तातडीने वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी बेगाजी टोमके यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार भुरके पुढील तपास करीत आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना माळवटा येथे घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.