वहिवाटीचा रस्ता मोकळा करावा!
तहसील कचेरीवर उपोषणाला प्रारंभ
मानोरा (Farmer Protest) : तालुक्यातील दापुरा शिवारातील वहिवाटीचा शेत रस्ता मोकळा करून देण्याकरिता दि. १८ मे पासून तहसील कचेरीवर मौजे दापुरा येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे दापुरा शिवारातील गट क्रमांक २२/१ अ वहिवाटीच्या रस्त्यावरील लाग, काटे हटवून शेत रस्ता त्वरीत मोकळा करून देण्यासंदर्भात वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे न्यायासाठी सोमवारपासून आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
या उपोषणाला माजी पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्यासह अनेकांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी दिला असून वृत्त लिहिस्तोवर उपोषण सुरूच होते.
या उपोषणात दापुरा येथील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.