अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागातील कामकाजाच्या

'नियमांनुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या'; तुकाराम मुंढेंचा कर्मचाऱ्यांना इशारा

Employee Complaint

29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे तक्रार; दोन शिफ्ट, सुट्टी आणि कामाच्या ताणावरून वाद, मुंढेंनी लॅब 24 तास सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागातील कामकाजाच्या पद्धतीवरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. FDA चे आयुक्त तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत, शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल तर राजीनामा देण्याचा पर्याय खुला असल्याचे सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 15 जुलै रोजी खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे निवेदन सादर करून मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवले आहेत. या निवेदनात दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन सादर करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, प्रयोगशाळा ही सामान्य शासकीय कार्यालयाप्रमाणे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत चालणारी व्यवस्था नसून ती 24 तास कार्यरत राहणारी सेवा आहे. त्यामुळे शिफ्ट पद्धतीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंढे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून दिवसात फक्त एकच शिफ्ट घेतली जाते आणि आठवड्यात 48 तासांपेक्षा अधिक काम करून घेतले जात नाही. तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या नियमांपेक्षा अधिक काम कोणालाही दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यात एक सार्वजनिक सुट्टी दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये सहा दिवस काम सुरू असून भविष्यात गरज भासल्यास 24 तास सेवा सुरू करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. खासगी तसेच सरकारी प्रयोगशाळा 24 तास कार्यरत असतात आणि त्याच धर्तीवर कामकाज सुरू ठेवण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

कर्मचाऱ्यांची सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नियमित कार्यालयीन कामकाजाची मागणी मान्य होऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत, "ज्यांना शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल, त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे (They are free to resign and go)," असे स्पष्ट वक्तव्य तुकाराम मुंढे यांनी केले.

दरम्यान, या वादानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक वर्षांपासून काही शासकीय विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार काम करण्याची पद्धत रूढ झाल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर, तुकाराम मुंढे यांनी शिस्तबद्ध आणि नियमाधारित कामकाजावर भर दिल्यामुळेच त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे.