Parbhani farmer death: ४५-वयाच्या शेतकर्‍याचे मृतद

परभणीत लोंबकळणार्‍या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने शेतकर्‍याचा मृत्यू

Parbhani farmer death

पूर्णा शहरातील घटना; दोन दिवसापासून बेपत्ता होता शेतकरी

परभणी (Parbhani farmer death) : पूर्णा शहरालगतच्या शेतात लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने ४५ वर्षीय शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकर्‍याचा मृतदेह शनिवार २५ जुलै रोजी दुपारी शेतातील नालीत आढळून आला. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेश नामदेव सोनवणे (वय ४५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, पूर्णा) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. शहरालगत असलेल्या शेतातील आखाड्यावर जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी ते २३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. बेपत्ता झाल्याची तक्रारही पूर्णा पोलिसांत दाखल करण्यात आली होती.  दरम्यान, २५ जुलै रोजी दुपारी नातेवाईक शेतात शोध घेत असताना राजेश सोनवणे यांचा मृतदेह शेतात जाण्यासाठी खोदलेल्या नालीत पडलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची (Parbhani farmer death) माहिती मिळताच फौजदार श्रीनिवास पडलवार, जमादार आनंद सोनकांबळे, राहुल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, पूर्णा येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. प्राथमिक तपासात शेतातील लोंबकळणार्‍या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.  तपास जमादार राहुल मोरे करीत आहेत.