विशेष मतदार यादी पुनरीक्षणात राज्यात हिंगोलीच अव्वल
मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणात ८९.९७ टक्के काम पूर्ण
हिंगोली (Hingoli SIR Campaign) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात ८९.९७ टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता वसमत मतदारसंघात ९०.२८ टक्के, कळमनुरी मतदारसंघात ९०.४४ टक्के आणि हिंगोली मतदारसंघात ८९.२२ टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. या कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने राज्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियानांतर्गत (Hingoli SIR Campaign) मतदारांच्या नोंदींची पडताळणी करून त्यासंदर्भातील अर्जांचे संगणकीकरण करण्याचे काम जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. तहसील प्रशासन, निवडणूक शाखा, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे. या (Hingoli SIR Campaign) प्रक्रियेत जिल्ह्यातील मतदारांनी दिलेल्या सहकार्याचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अर्जांच्या संगणकीकरणाचे काम वेगाने पूर्ण होत असून हिंगोली जिल्ह्याने राज्यातील आपली आघाडी कायम राखली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच सहकार्य करणाऱ्या मतदारांचे अभिनंदन केले आहे. उर्वरित कामही अचूकता, गुणवत्तेला प्राधान्य देत निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.